मुंबई : स्मार्ट सिटी उभारण्यासाठी आवश्यक यंत्रणा, तंत्रज्ञान, सेवा, उत्पादने यांचे ‘स्मार्ट आशिया 2019’ प्रदर्शन नुकतेच मुंबईत सुरू झाले. तैवान एक्सर्टनल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिल आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतातील तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे प्रतिनिधी चुंग क्वान टीएन यांच्या हस्ते झाले.
बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे भरलेल्या या प्रदर्शनात स्मार्ट वाहतूक, स्मार्ट ऊर्जा, स्मार्ट जल व्यवस्थापन इत्यादी सुविधा उभारण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, उपकरणे पहायला मिळत आहेत.
चुंग क्वान टीएन म्हणाले, ‘दोन्ही देशांमधील व्यापार सहा पटींनी वाढून ७.५ अब्जांवर पोहोचला आहे. भारत आणि तैवान दरम्यानचे व्यापारी संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत आणि तैवान परस्पर सहकार्याच्या आधारे भारतात स्मार्ट सिटी निर्माण करू शकतात.’
तैवान एक्सर्टनल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिलच्या एक्झिबिशन डिपार्टमेंटच्या कार्यकारी संचालक एमिलिया शीह म्हणाल्या, ‘ स्मार्ट सिटी उभारणे हा एक जागतिक प्रवाह आहे. जगातील निम्म्याहून अधिक जनता शहरांमध्ये राहते आणि २०५० पर्यंत दोन तृतीयांशहून अधिक लोक शहरांमध्ये येणार आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी उभारण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. भारत आणि तैवान यांच्यात दीर्घ काळापासून उत्पादक भागीदारी असल्यामुळे स्मार्ट सिटीच्या उभारणीत दोन्ही देश उत्तम सहकार्य करू शकतील.’